बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प; ग्राहकांना मनस्ताप

मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड शहरात नवाबकाळापासून अस्तित्वात असलेल्या एकमेव पोस्ट ऑफिसमधे बीएसएनएलच्या ठप्प सेवेमुळे सर्व कामकाज बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यापासून सेवा खंडित असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील कोणतेच काम सुरळीत पार पाडत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रजिस्टरएडी, मनीऑर्डर, स्पीड पोस्ट, मासिक ठेव योजना, सुकन्या योजना अशा असंख्य सेवा पोस्ट खात्यामार्फत दिल्या जातात, परंतु बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असल्याने पोस्टातील सर्व कामांना ब्रेक लागला आहे.
ग्राहक नेट नसल्याने परत जात आहेत. हा त्रास अनेक दिवसांपासून सहन करावा लागत असून वेळोवेळी कार्यालयात तक्रार देऊनसुद्धा कोणीच काम करीत नसल्याने याचा त्रास पोस्ट कार्यालयास सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने मुरूड पोस्ट कार्यालयात्ील कर्मचार्यांना सर्व कामे 48 किलोमीटर लांब असणार्या अलिबाग येथून करावी लागत आहेत. इंटरनेट सेवेत सातत्य नसल्याने याचा परिणाम काही बँका, शाळा, पतसंस्था व इंटरनेटवर चालणार्या सर्व सेवांवर होत आहे. बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्याने यावर अवलंबून असणार्या सेवा बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे.
मुरूड येथील टेलिफोन खात्याचे अभियंता रूपेश पाटील यांना याबाबत विचारणा केली असता सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने टेलिफोन लाइन भिजल्याने अथवा पाणी पडल्याने सदरची समस्या निर्माण झाली आहे. आमच्या कर्मचार्यांना त्वरित पोस्ट कार्यालयात पाठवून सदरची समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper