महाड ः प्रतिनिधी
महाडमध्ये मागील काही दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन दिवस सुटीचे गेल्याने सोमवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाल्याने शहरातील विविध बँकांमधून एकच गर्दी दिसून येत होती. या गर्दीचे शहरातील नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले.
शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी झालेला नाही. त्यातच लॉकडाऊनदेखील बर्यापैकी उठविले आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणांचीदेखील पूर्वतयारी ग्रामीण भागात सुरू आहे, मात्र गेली चार महिने हाताला काम नसलेल्यांना बँकांत साठवून ठेवलेली रक्कमच आधार ठरली आहे. त्यामुळे बँकांमधून सातत्याने गर्दी होत आहे. कोरोनाचा कहर असला तरी पैशांकरिता लोकांना बँकेत यावेच लागत आहे. बँकांचा कारभार आजही संथगतीचा आणि अपुर्या जागांमधून सुरू असल्याने नागरिकांना ठरावीक अंतर ठेवून उभे राहणेदेखील अशक्य बनले आहे. सोमवारी महाड शहरात असलेल्या एटीएम आणि बँकांमधून एकच गर्दी झाली. ही गर्दी थेट रस्त्यावर आल्याचे चित्र दिसू लागल्याने येणार्या-जाणार्या नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोनाचा कहर आजही संपला नसला तरी आर्थिक गणित सुरळीत होण्यासाठी बँका आणि इतर व्यवहार सुरू ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून मास्क आणि ठरावीक अंतर ठेवून उभे राहणे गरजेचे आहे, मात्र शहरातील बँका अपुर्या जागेत असल्याने हे अंतर ठेवणे नागरिकांना अशक्य होत आहे. त्यामुळे काही बँकांमधील रांगा रस्त्यावर येऊन थांबल्या होत्या.