खोपोली : प्रतिनिधी
सोमवारी महाड येथील पाच मजली रहिवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याची दखल घेत खोपोली शहरातील पंधरा वर्षा वरील जुन्या रहिवासी इमारतीचे बांधकाम मजबुती ऑडिट होण्याची गरज सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
खोपोली शहरातही माती भराव टाकून टोलेजंग रहिवासी संकुले उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक इमारतीत मूळ संरचनेत बदल करून व्यवसाहिक गाळे ही मोठया प्रमाणात करण्यात आले आहेत. तसेच अनेक इमारतीवर वाढीव मजले निर्मिती करण्यात येत आहे. काही ठिकाणी नगरपालिकेकडून परवानगी तर अनेक ठिकाणी बिना परवाना बांधकामे सुरू आहेत. या बाबतही नगरपालिकेकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मागील वर्षाचा नगरपालिका पाहणी अहवालानुसार खोपोली नगरपालिका क्षेत्रात एकूण 126 रहिवासी इमारती जुन्या व धोकेदायक आहेत तर शहरात शेकडो रहिवासी घरे अति धोकेदायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगरपालिका कडून त्या बाबत संबंधितांना नोटीशीही देण्यात आल्या आहेत. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महाडसारखी भयंकर दुर्घटना होण्यापूर्वी या बाबतही नगरपालिकेकडून ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नगरपालिका कडून संपूर्ण शहरातील पंधरा वर्षे पूर्वी बांधकाम झालेल्या रहिवासी इमारती व व्यापारी संकुलाचे सरसकट बांधकाम मजबुती ऑडिट करण्याची मागणी सामाजिक संस्था व नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. महाड येथील घटनेनंतर खोपोली नगरपालिका कडून ही हालचाली सुरू झाल्या असून, धोकेदायक व अति धोकादायक इमारती मधील रहिवाशांना सदर इमारती खाली करून अन्यत्र स्थलांतरित होण्यासाठी ठोस कार्यवाही साठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे समजते आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper