कोरोनाबाधितांची संख्या मात्र अधिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडाही 29 हजारांवर पोहचला आहे. 1 जुलैला नवी मुंबई शहरातील मृत्युदर हा 3.26 होता. त्यात घट होत तो 2.20 टक्केपर्यंत खाली आला आहे. नवी मुंबईच्या तुलनेत शेजारील 23 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातील व 13 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पनवेल महापालिका हद्दीतील मृत्युदर हा अधिक आहे.
गणेशोत्सवानंतर देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्युदरामध्येही वाढ होत आहे. 1 सप्टेंबरपासून ‘पुन्हा सुरुवात’ मोहिमेंतर्गत बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. मॉलही सुरू झाले असून ई-पासची सक्ती नसल्याने शहरातील नागरिकांचा संचार वाढला आहे.
नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत आहे. हा मृत्युदर शेजारील ठाणे व पनवेल महापालिकेपेक्षा कमी आहे. ठाण्याचा मृत्युदर 3.06 टक्के तर नवी मुंबईचा 2.20 टक्के इतका आहे. गेल्या महिन्यात तो 2.64 टक्के इतका होता.
नवी मुंबई पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रुग्णवाढ कितीही होऊ द्या, परंतु मृत्यू होता कामा नये अशी भूमिका ठेवत काम सुरू केले आहे. शहरातील प्रत्येक मृत्यूची ते अधिकार्यांकडून ते स्पष्टीकरण घेत आहेत. त्या रुग्णाला दिलेल्या उपचाराचाही तपशील ते घेत आहेत. मृत्युदर कमी करण्यासाठी दरदिवशी सायंकाळी 7 वाजता संबंधित विभागातील अधिकारी यांना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची व त्याच्यावरील उपचाराची सविस्तर माहिती आयुक्तांना द्यावी लागत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शहरात दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करोनामुळे एकूण 96 मृत्यू झाले होते. 1 जुलैला शहरात एकूण 223 मृत्यू होते. तीच संख्या आता 635 पर्यंत झाली आहे. मागील 30 दिवसांतील वाढीव मृत्यूचा दर हा 1.5 इतका कमी झाला आहे.
बरे होणार्यांचे प्रमाण चांगले
नवी मुंबईत मृत्युदर घटला असून कोरोना आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण 86 टक्के इतके आहे. आतापर्यंत 24 हजार 629 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
बाधितांच्या संख्येत वाढ
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज 300 ते 350 कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. महापालिकेची स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा निर्माण झाल्यानंतर जास्तीत जास्त कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. चाचण्यांची संख्या दीड लाखावर गेली आहे. चाचण्यांत वाढ झाल्याने बाधितांचा आकडाही वाढत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.