Breaking News

ऑक्टोबर हीटपासून बचाव करण्यासाठी घ्या काळजी

आरोग्य प्रहर

ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागते, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतो. या ऑक्टोबर हीटमुळे वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी पुन्हा सुरू होतात. बर्‍याच जणांना या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या तक्रारी सतत जाणवत असतात. योग्य ती काळजी घेतली नाही तर या तक्रारी वाढत जातात. म्हणूनच आपण घराबाहेर पडताना वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जरूर योग्य काळजी घ्यायला हवी. (उदाहरणार्थ छत्री वापरणे, टोपी घालणे आदी) त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी आपल्याला कमी जाणवतील.

त्यातूनही जर उष्णतेच्या तक्रारी जाणवू लागल्याच तर आपल्याला काही साधेसोपे उपाय करता येतील. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील खनिजे आणि क्षार कमी होतात. ते भरून काढण्यासाठी भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. मग त्या चिरून पाणी घालून ठेवाव्यात. साधारणत: तीन ते चार तासांनंतर ते पाणी गाळून प्यावे आणि भाज्यांमध्ये पुन्हा दुसरे पाणी घालून ठेवावे. असे आपण पूर्ण दिवस करू शकतो. यासाठी सगळ्याच भाज्यांचा आपण वापर करू शकतो. दिवसभरानंतर मात्र या भाज्यांचा वापर करू नये. उष्णतेमुळे घामातून होणारा खनिजांचा र्‍हास याने भरून निघण्यास मदत होऊ शकते.

त्याप्रमाणे धने रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसर्‍या दिवशी दिवसभर थोडे थोडे प्यावे. सब्जा भिजवून ते पाणीदेखील आपण पिऊ  शकतो. त्याने आपल्या शरीराला थंडावा मिळेल. ताजे ताक रोज घ्यावे. या दिवसांमध्ये कोथिंबिरीचा वापर भरपूर प्रमाणात करावा. भाज्यांचा रसदेखील उपयुक्त ठरतो. (उदाहरणार्थ गाजर, टोमॅटो ज्यूस) त्यामध्ये कोथिंबीर आणि सब्जाचा वापर करावा. कोहळा या वातावरणामध्ये उष्णता कमी करण्यासाठी खूप मदतीचा ठरेल. शिवाय आपले नेहमीचे गुलकंद, काळे मनुके, फळांचे ज्यूस, नारळपाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी आदींचे प्रमाण वाढवणेदेखील उष्णतेवर फायदेशीर ठरेल. या दिवसांत अतितेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply