Breaking News

सोलापुरात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. वैरागजवळील राळेरास येथे शुक्रवारी (दि. 21) हा भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. जखमींतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

छगन काळे (34, रा. पानगाव, ता. बार्शी), संदीप घावटे (23, रा. पांढरी, ता. बार्शी), देवनारायण काशीद (44, रा. कव्हे, ता. बार्शी), संभाजी महिंगडे (49, रा. बार्शी) व राकेश मोहरे (32 रा. बार्शी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत, तर शुभांगी बांडवे (35), वर्षा आखाडे (35), नीलकंठ कदम (34), कविता चव्हाण (31), नरसिंह मांजरे (55), रागिणी मोरे (29), आण्णासाहेब जाधव (31) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बार्शीहून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसने राळेरासमध्ये एका जीपला धडक दिली. यामध्ये जीपचा चक्काचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघातातील मृत व काही जखमी हे बार्शी तालुका पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी आहेत. शुक्रवारी सोलापुरात बचत गटांतर्गत उडान अभियान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व जण बार्शी येथून सोलापूरकडे येत होते. सोलापूर-बार्शी हा सुमारे 80 किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे खूपच जिकिरीचे होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply