Breaking News

पोलादपुरात माकडांचा, तर तालुक्यात रानडुकरांचा हैदोस; श्वान निर्बिजीकरणानंतरही पिल्ले रस्त्यावर

पोलादपूर : प्रतिनिधी

शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून, तालुक्यात भातपीक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्ले आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्त संचार दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी पोलादपूर तहसील कार्यालयासमोर एक टेम्पो जप्त करून उभा करण्यात आला होता. त्यातील तांदूळ खाण्यासाठी अनेक माकडे गोळा होत असत. काही कालावधीनंतर तो टेम्पो मूळ मालकाने ताब्यात घेतल्याने ही माकडे शहरातील विविध लोकवस्त्यांमध्ये मुक्त संचार करून नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास देऊ लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी पिसाळलेल्या माकडांनी महिलांना चावे घेतल्याच्या घटना झाल्या असतानाही वन विभागाकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. गेल्या वर्षी शेतातील भातपीक हाती येण्याच्या सुमारास रानडुकरांनी दिविल भागातील एका शेतकरी कुटुंबावर हल्ला करून जखमी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारे वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त केला नाही. परिणामी पोलादपूर तालुक्यात रानडुकरांपासून भातपिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांवर रात्री पहारा देण्याची वेळ ओढवली आहे, मात्र भातपिकाचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रतिकारात रानडुक्कर मेल्यास शेतकर्‍यांविरुद्ध शिकारीचा गुन्हा दाखल होत असल्याने कोणीही असा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसानही होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्याच वर्षी पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवूनही सध्या शहरातील रस्त्यांवर कुत्रीची नवजात पिल्ले ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे निर्बिजीकरणाच्या मोहिमेचा खर्च वाया गेला अथवा कसे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply