Breaking News

नागोठण्यात गुरे पळविण्याचा प्रयत्न

जागरूक नागरिकाच्या सतर्कतमुळे डाव फसला; बेशुद्ध अवस्थेत सापडली तीन गुरे

नागोठणे : प्रतिनिधी

आज पहाटेच्यादरम्यान तीन गुरांना बेशुद्ध करून गाडीत भरण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. 26) पहाटे नागोठणे येथे सुरू होता. मात्र एका वयस्कर व्यक्तीच्या जागरूकतेमुळे हा गुरे पळविण्याचा प्रयत्न फसला. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक नामदेव जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांना पाचारण केले व या तीनही गुरांवर उपचार करून त्यांना वाचविण्यात यश मिळविले.

नागोठणे एसटी स्थानकानजीक विशाल मेडिकल स्टोअर्सजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास सुमारे दीड वर्षे वयोगटातील तीन गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन एका स्कॉर्पिओ गाडीत भरण्याचा प्रयत्न केला जात होता. बंगलेआळीत राहणार्‍या शशिकांत देवळे या वयस्कर गृहस्थाच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे सावध झालेल्या अज्ञात चोरट्यांनी बेशुद्ध अवस्थेतील तीनही गुरे तेथेच सोडून गाडीसह तेथून पलायन केले.

देवळे यांनी सकाळी उजडताना ही बाब इतर नागरिकांना सांगितल्यानंतर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील नामदेव जाधव यांनी डॉ. भोसले यांना पाचारण केले व या सर्व गुरांना सलाईन लावले. वेळीच उपचार केल्याने ही तीनही गुरे बचावली.

या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास चालू करण्यात आला आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध असल्याने हा कॅमेरा पोलिसांना तपासात महत्वाचा ठरू शकेल, अशी शहरात चर्चा केली जात आहे.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply