Breaking News

सत्तेच्या जोरावर दादागिरी करणार्‍यांची गय केली जाणार नाही

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा महाविकास आघाडीला घरचा अहेर

रोहा : प्रतिनिधी
रोहा आणि मुरूड तालुक्यात फार्मा उद्यान विकसित करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचना काढली आहे, मात्र या प्रकल्पासाठी आम्ही एकही गाव उठवू देणार नाही. वेळप्रसंगी रोहा तहसील कार्यालयावर मशाल मोर्चासुद्धा नेऊ, असा इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी (दि. 11) महाविकास आघाडी सरकारला दिला.
राज्यातील महाविकास आघाडीने रोहा व मुरूड तालुक्यात फार्मा उद्यान विकसित करण्याचे ठरविले आहे. त्यात रोहा तालुक्यातील सात व मुरूड तालुक्यातील 13 गावे बाधित होणार आहेत. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या संदर्भात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी न्हावे येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. स्थानिकांना भकास करणार्‍या या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, असा निर्धार व्यक्त करून आमदार पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
या विभागात अनेक जमिनींचे खोटे व्यवहार झाले आहेत. त्यांचीही चौकशी करण्याची मागणी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केली. जमिनी खरेदी करण्याासाठी पैसे कुठून आले. याचा हिशेब आम्ही घेणार असून, त्यासाठी ईडी, एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेकापकडून करण्यात येईल, असेही आमदार जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.
स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादला जाणार असेल, तर हे स्थानिकांना फसविण्याचे राज्य सरकारचे षड्यंत्र आहे. जनतेने जागृत राहून त्याला विरोध करावा. शासनाकडून देण्यात आलेल्या नोटिसींना व्यक्तिगत विरोध करा, असे आवाहन करून सत्तेच्या जोरावर दादागिरी करू पाहणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार पाटील यांनी या वेळी दिला.
शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, राजिप समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, रोहा पं. स. सभापती गुलाब वाघमारे, तालुका चिटणीस राजेश सानप, न्हावे सरपंच राजश्री न्हावकर यांच्यासह परिसरातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply