Breaking News

मोगली धरणाचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आमदार गणेश नाईक यांना आश्वासन

नवी मुंबई : बातमीदार – रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील ब्रिटीशकालीन मोगली धरण लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे. माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे सोमवारी (दि. 23) भेट घेतली. या भेटीत नवी मुंबईतील रेल्वेविषयक महत्त्वाच्या मागण्या व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीस ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते.

माजी खा. डॉ. नाईक यांनी त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात मोगली धरण नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची संख्या पाहता दिघा आणि खैरणे-बोनकोडे ही दोन रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करुन घेतली होती.

याआधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरण विकत घेण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नवी मुंबई शहर स्वयंपूर्ण झाले आहे. मोगली धरण महानगरपालिकडे हस्तांतरीत करुन घेतल्यास अतिरिक्त पाण्याचा एक स्त्रोत महापालिकेकडे तयार होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी पर्यटनस्थळ देखील विकसित करता येईल, अशी भूमिका आ. नाईक यांनी रेल्वेमंत्र्याच्या बरोबरच्या बैठकीत मांडली. 31 ऑगस्ट 2018 रोजी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे तत्कालिन आमदार संदीप नाईक यांनी देखील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे दिर्घकालीन भाडेपट्ट्यावर हस्तांतरीत करावे, अशी मागणी केली होती.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply