Breaking News

पाणीप्रश्नी सिडको कार्यालयावर धडक

नवीन पनवेलमधील महिला आक्रमक; नगरसेवकांची साथ

पनवेल ः प्रतिनिधी

नवीन पनवेलमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी मंगळवारी (दि. 1) सकाळी सिडको कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिलांनी कार्यालयाचे गेट अडवून धरल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता दलाल यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा केली. मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा करण्याचे आणि ज्या ठिकाणी पाणी येणार नाही तेथे टँकरने पाणी देण्याचे या वेळी ठरले. 

नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत अनेक दिवसांपासून पाणी समस्या आहे. प्रभाग 17मधील ए टाइपमध्ये पाच-सहा दिवस पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील महिलांनी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रभाग समिती अध्यक्ष सुशीला घरत आणि वृषाली वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेलमधील सिडको कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक देत धरणे धरले. या वेळी कार्यालयात कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. महिलांनी अधिकारी आल्याशिवाय येथून उठणार नसल्याचे जाहीर केल्यावर कोकण भवनवरून कार्यकारी अभियंता दलाल यांनी येऊन चर्चा केली. 

या वेळी त्यांनी आपल्याला 32 एमएलडी पाणी आवश्यक असताना एमजीपीकडून 26 एमएलडी पाणी मिळते. त्यातच आज फक्त 21 एमएलडी पाणी मिळाले. त्यांच्या पाइप लाइन बदलण्याची गरज आहे. त्याचे टेंडर मंजूर झाले आहे. त्या लाइन बदलल्यावर आपला पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले. पाणी येणार नसल्यास ग्राहकांना सूचना दिली जात नसल्याचीही तक्रार या वेळी करण्यात आली. अखेर संध्याकाळी 80 टक्के लोकांना पाणीपुरवठा करण्याचे आणि पाणी मिळणार नाही त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता दलाल यांनी दिले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply