Breaking News

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

आंबेगाव ः प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातील दैनंदिन कामे आटपून ढोबळे हे घराकडे परतत होते. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणार्‍या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागून थेट हल्ला करीत त्यांना जखमी केले. या भयानकप्रसंगी ढोबळे यांनी घाबरून न जाता आरडाओरडा करीत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यांच्या या प्रतिहल्ल्याने बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. यापूर्वीदेखील बिबट्याने धनू पाचपुते, विलास पाचपुते, रामचंद्र ढोबळे, शिवराम ढोबळे यांच्या गायीच्या गोठ्यावर हल्ला करून कालवडींचा फडशा पाडला होता. या परिसरात सध्या अशा घटना सतत घडत असल्याने दिवसाही लोकं शेतात काम करण्यास घाबरत आहेत. त्यात दिवसाच्या लोडशेडिंगमुळे रात्री पिकांना पाणी द्यावे लागते.

अशा भयभीत वातारणात किमान दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी आणि या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply