उरण : प्रतिनिधी
चिरनेर-खारपाडा मार्गावर दिघाटी खिंडीतील वळणावर भरधाव वाहने जात असलेला (क्र. जी. जे.12 झेडझेड-6053)अवजड गॅस टँकर चालकाला वेग न सावरल्याने उलटा होऊन दुर्घटना घडली आहे. गॅस टँकर उलटल्याने त्यामधून वायू गळती सुरू झाली होती. त्यामुळे या मार्गाला लागून असलेल्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशमन विभागाला तत्काळ पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमनच्या जवानांनी प्रयत्न सुरू केल्याने काही वेळातच रस्त्याच्या कडेला उलटा झालेल्या गॅस टँकरची गळती थांबविण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले. त्यामुळे भयभीत झालेल्या चिरनेर-खारपाडा मार्गावरील दिघाटी गाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अवजड गॅस टँकर बाहेर काढण्यासाठी दोन मोठे क्रेन आणण्यात आले होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नांने गॅस टँकर सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आला.
वाहतूक ठप्प; प्रवाशांची गैरसोय
या अपघाताने मार्गावरील वाहतूक रात्री 8. 30 ते दुसर्या दिवशी सकाळी 11.00 वाजेपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई व ठाणे येथील कोकणाकडे जाणार्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. त्यांना 10 किमीचा वळसा घालून वशेणी-कोप्रोली मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालक व पादचारी कमालीचे हैराण झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper