मुरूड : प्रतिनिधी
रस्ता दुरुस्तीची कामे सुरु करण्याआधीच नगर परिषदेने पत्र दिल्याने मुरूड एसटी आगाराने शहरातील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल व गैरसोय होत असून, त्यांना आर्थिक भूर्दंडही पडत आहे.
एसटीचे मुरूड आगार शहरापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर आहे. मात्र स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या सर्व गाड्या शहरात फिरुन नंतर मार्गस्थ व्हायच्या. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होत होती. मात्र मुरुड नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने 24 डिसेंबर रोजी एसटी आगारप्रमुखांना पत्र देऊन शहरांतर्गत रस्तादुरुस्तीची कामे सुरु करीत असल्याचे कळविले. त्यामुळे आगारप्रमुख सनील वाकचौरे यांनी 27 डिसेंबरपासून मुरुड शहरातील बस फेर्या बंद केल्या आहेत.
मुरूडमधील रस्ता दुरुस्तीची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. मात्र नगर परिषदेने पत्र दिल्यामुळे मुरूड आगाराने शहरातील बस फेर्या बंद केल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रवाशांना बस पकडण्यासाठी दीड किलोमीटर लांब असलेल्या एसटी आगारात जावे लागते.
एसटीच्या मुरुड शहरातून जाणार्या बसेस पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत थेट आगारातूनच मार्गस्थ होणार आहेत, त्या शहरात जाणार नाहीत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
-सनील वाघचौरे, आगार व्यवस्थापक, मुरूड
RamPrahar – The Panvel Daily Paper