भाजपचे आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई ः प्रतिनिधी
महानगरपालिकेतर्फे सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान सुरू आहे. स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळावा म्हणून हे सर्व अभिमानास्पद असले तरी महानगरपालिका प्रशासनाचे उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरातील उद्यानांवर नोव्हेंबरपर्यंत 28 कोटींचा खर्च करण्यात आला, परंतु नेरूळ प्रभाग क्र. 87 सेक्टर 8मधील छत्रपती शाहू महाराज उद्यानाची दुरवस्था झाली असूूून आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भाजप वॉर्ड अध्यक्ष गणेश रसाळ यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथे खासदार निधीतून उद्यानाचे सुशोभीकरण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दिमाखात कार्यक्रम घेऊन करण्यात आले, परंतु त्याचे मेन्टेनन्स करण्याचे नियोजन कोणाच्याही ध्यानी आले नसल्याने या ठिकाणी संगीत यंत्रणा पाच ठिकाणी बंद अवस्थेत आहे. एका ठिकाणी त्याचा स्पीकरच गायब आहे. ओपन जिमकरिता लावण्यात आलेले साहित्य, लहान बालकांसाठी लावण्यात आलेली खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. उद्यानात लावण्यात आलेले गवत व त्याकरिता लावण्यात आलेले पाण्याचे फवारे बर्याच ठिकाणी बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी गवत गायब झालेले व सुकलेल्या अवस्थेत आहे. सायंकाळनंतर उद्यानात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना वेळेआधीच उद्यान सोडावे लागते. अशा अनेक समस्यांना येथील नागरिकांना रोज सामोरे जावे लागते.
RamPrahar – The Panvel Daily Paper