मुंबई : प्रतिनिधी
वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुध्द दोन हात करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धोरणावरून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र हे आश्वासन पुन्हा मागे घेण्यात आले. राज्य सरकारने लाईट बिल माफ केले पाहिजे. हिंमत असेल तर महावितरणने घरगुती कनेक्शन तोडून दाखवावे. त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तसेच सरकारशी दोन हात करण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत. मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरू केल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने हजारो कोटींची सुट बिल्डर्संना दिलेली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांकडे रोजगार नव्हता. अशावेळी सामान्य लोकांचे चार पट जास्त आलेले बिल हे सुधरवण्याची गरज होती. मात्र असे न करता थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper