देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुंबई ः प्रतिनिधी
हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला जळजळीत प्रत्युत्तर दिले असून, हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असूच शकत नाही. हिंदुत्व जगावे लागते. नुसते भाषणातून बोलून चालत नाही. ज्या वेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब होतात, ज्या वेळी शिवगान स्पर्धा बंद होऊन अजान स्पर्धा सुरू होते, तेव्हा असे वक्तव्य द्यावे लागते. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केले असावे. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडले एवढेच सांगावे, असे आवाहनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र सुरू आहे हे काल उघड झाले. जे आंदोलन सुरू आहे त्याचा फायदा घेत कशा प्रकारे भारताला बदनाम करायचे, भारतात अराजकता निर्माण करायची यासंदर्भातील योजना बाहेर आली. कशा प्रकारे वेगवेगळ्या देशातील नेत्यांना यात आणून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करून भारताला कसे बदनाम करायचे हे कालच्या ट्विटमुळे उघड पडले. आता देशातील लोकांनाही आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक आपली पोळी भाजण्याचा व भारतविरोधी काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे समजले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यपालांचीही ठाकरे सरकारवर टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली असून, महाराष्ट्र सरकार काय करतंय, अशी विचारणा केली आहे. तसेच काहीतरी गडबड आहे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात बोलताना त्यांनी ही टीका केली. नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कविता राऊतही कार्यक्रमास उपस्थित होती.
क्रीडामंत्री सुनील केदार यांनी कविताला नोकरीचे आश्वासन दिले होते, पण अजून नोकरी मिळाली नाही. मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल, तर काहीतरी गडबड आहे, पण मी कविताला सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकारचे येथे असे काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात, अशी टीका राज्यपालांनी या वेळी केली.
आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतंय, अशी विचारणाही त्यांनी केली. राज्यपालांनी या वेळी आपण मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.