उघड्या नाल्यांमुळे अपघाताच्या भीतीसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात
पाली : प्रतिनिधी
पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व परिसरातील बाजारपेठेत येणार्या जाणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सुधागड पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. या नाल्यांत सांडपाणी तुंबत असून, त्यात अनेक कीटक, जीवजंतूची पैदास होत आहे. हे नाले उघडे असल्याने त्यातून सतत दुर्गंधी येत असते. नाल्याच्या बाजूने बसस्थानकात एसटी बस शिरतात व बाहेरदेखील येतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचीदेखील शक्यता आहे.
नागरिकांची सातत्याने मागणी होऊनदेखील अद्यापपर्यंत या नाल्यांबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाली बसस्थानकात प्रवाशांची सतत वर्दळ व रहदारी सुरू असते, शिवाय सभोवताली दुकाने, हॉटेल, रसवंतीगृह तसेच मच्छी व मटण मार्केट असल्याने नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे या नाल्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाली एसटी बसस्थानकासमोरील नाल्यांची साफसफाई केली जाईल तसेच भविष्यात रोगराई पसरू नये यासाठी योग्य प्रकारे बांधकाम करून नाल्यांची समस्या मार्गी लावू.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड
RamPrahar – The Panvel Daily Paper