पनवेल ः रामप्रहर वृत्त
ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील रिक्त झालेल्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी जांभिवली, खानाव आणि कसळखंड या तीन ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 6) तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. ग्रामीण भागात भाजपची वाढलेली ताकद पाहता पक्षाला घवघवीत यश प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पनवेल तालुक्यात होणार्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचायतीमधून सुप्रिया कृणाल निकम (पवार), खानाव ग्रामपंचायतीमधून उषा रोशन फराड व पूनम प्रकाश तवले आणि कसळखंड ग्रामपंचायतीमधून कांता चंद्रकांत मते व मनीषा सचिन पाटील या भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पनवेल तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी मुकेश कांबळे, राजेंद्र दत्तात्रेय कांबळे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री दिसले, उपसरपंच बाळाराम पाटील, जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रिया कोंडिलकर, कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, प्रवीण ठाकूर, बूथ अध्यक्ष यशवंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात केलेली विकासाची कामे आणि पक्षाची वाढलेली ताकद पाहता या निवडणुकीत चांगले यश प्राप्त होईल असे दिसते.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …
RamPrahar – The Panvel Daily Paper