Breaking News

फळसगाव-पाचाड रस्ता रुंदीकरणात शेतजमिनींचे नुकसान

नुकसानभरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

महाड : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील निजामपूर ते किल्ले रायगड या मार्गाचे रुंदीकरण सुरु करण्यात आले असून, या रुंदीकरणात ज्यांच्य जमिनी गेल्या आहेत, त्या शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

किल्ले रायगडाकडे येण्यासाठी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथून पाचाड आणि पुढे किल्ले रायगड असा मार्ग कांही वर्षापासून सुरु झाला आहे. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होता, मात्र आता या मार्गाचे निजामपूर-पाचाड-महाड-मंडणगड असा नामविस्तार करून महामार्ग बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या मार्गाचे काम नव्याने हाती घेण्यात आले असून त्यातील फळसगाव ते पाचाडपर्यंत रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. मात्र स्थानिक शेतकर्‍यांना त्यााची कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही. ज्या जमिनीतून रुंदीकरण केले जात आहे, त्या जमिनीचे संपादन करण्यात आलेले नाही. दरम्यान, या रस्ता रुंदीकरण कामात शेतजमिनीचे नुकसान झाल्याची तक्रार पुनाडे (ता. महाड) ग्रामस्थांनी केली आहे.

पुनाडे गावातील जवळपास 25 शेतकर्‍यांची जमीन या रस्ता रुंदीकरणात जात आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकर्‍यांना कामाची पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही शिवाय भूसंपादनदेखील केलेले नाही. आजही जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍यांचीच नावे असल्याने जामिनीचे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी पुनाडे ग्रामस्थांनी केली आहे.

जमिनीची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पुनाडे ग्रामस्थांनी आजपर्यंत महाडचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप जयेश लामजे, मोतीराम जगताप, शशिकांत कंक, नामदेव पवार, संजय येलंगे, पांडुरंग भोसले, योगेश पवार या पुनाडे ग्रामस्थांनी केला आहे. पुनाडेप्रमाणेच शेजारील गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनीचे रस्ता रुंदीकरणात नुकसान झाले आहे.

फळसगाव ते पाचाड रस्त्याचे रुंदीकरण केले जात असून, त्यामध्ये पुनाडे ग्रामस्थांच्या जमिनींचे नुकसान होत आहे. या जमिनींचे संपादन झालेले नसून शासनाने होणार्‍या शेतजमिनींची नुकसानभरपाई द्यावी.

 -जयेश लामजे, ग्रामस्थ, पुनाडे, ता. महाड

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply