पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमध्ये विचुंबे रोडवर काही भाजीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते आपल्याला महापालिकेच्या कोविड-19च्या नियमावलीतून सवलत असल्यासारखे मास्क लावीत नाहीत. कारवाई होणार नाही या संभ्रमात काही विक्रेते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत.
पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स)द्वारे बैठक घेतली. यामध्ये त्यांनी पनवेल मनपा क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्ण संख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणार्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणार्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱया इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
त्याचरामाणे दोन दिवसात मास्क न वापरणार्यांकडून लाखो रुपये दंड वसूल केल्याची माहिती ही महापालिकेकडून देण्यात आली. पण शनिवारी संध्याकाळी नवीन पनवेल रेल्वे स्टेशन ते विचुंबे पुलापर्यंत पाहणी केली असता. काही छोटे हॉटेल व्यावसायिक, भेळ विक्रेते, भाजी विक्रेते व किरकोळ वस्तूंची रस्त्यावर व दुकानात विक्री करणारे मास्क न लावतच आपल्याला सवलत असल्यासारखे व्यवसाय करीत होते. महापालिकेने मास्क लावण्याच्या सूचना दिल्या असतानाही मास्क न लावता धंदा करीत असल्याचे येथील काही विक्रेते पाहायला मिळाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper