Breaking News

ठाकरे सरकार रामाचे नाही, भीमाचे नाही आणि कामाचेही नाही : रामदास आठवले

पालघर : प्रतिनिधी

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या संदर्भात चर्चा केल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ठाकरे सरकारवर आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यात्मक शैलीत जोरदार टीका केली. रिपाइंच्या वतीने विक्रमगडच्या दिवेकरवाडी येथे आदिवासी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना रामदास आठवले यांनी ’उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भीमाचे, नाही काही कामाचे,’ अशी बोचरी टीका केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली. मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे. सवर्ण समाजातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला. त्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा. आगामी जणगणना जातीवर आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल, असे आठवले यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात आठ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र आली, तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल. पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून, त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही आठवले या वेळी म्हणाले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply