Breaking News

मुरूड तालुक्याला रेड झोनमधून वगळावे

व्यापारी वर्गाची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे मुरूड तालुक्याला रेड झोनमधून वगळावे, अशी मागणी येथील व्यापारीवर्ग करीत आहे. मुरूड शहरात मागील एक महिन्यापासून मेडिकल, किराणा, भाजी मार्केट वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. फोटोग्राफर, टेलरिंग, ज्वेलर्स, रेडिमेड, सलून, हॉटेल, वडापाव गाडी, रिक्षा, सायबर कॅफे अशा व्यवसायांत हजारो मजूर काम करतात. ते सर्व आता लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत. आधीच मुरूडच्या मार्केटमध्ये मंदीची लाट होती. व्यापारी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हते. त्यात आता संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. मुरूडची जनता, पोलीस आणि नगरपालिकेच्या सहकार्याने मुरूडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. म्हणूनच मुरूड तालुका रेड झोनमधून वगळून संचारबंदी शिथिल करावी, तसेच सर्व दुकानदारांना सुरक्षित अंतराच्या अटी घालून दुकाने काही तासांसाठी उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुरूड शहरातील व्यापारी करीत आहेत.

निराधारांना दररोज भोजनाची व्यवस्था; श्री संत सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनासारख्या महामारीचे संपूर्ण जगासह देश तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि गावात पडसाद उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी झाल्याने अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. ज्या कुटुंबांचे हातावर घर चालत होते, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास आल्यावर शहरातील श्री संत सेवा मंडळ यांच्यामा़र्फत महिनाभरापासून शहरातील गरीब आणि गरजू व्यक्तींना तसेच मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईकडून कोकणात आपल्या गावी चालत जाणार्‍या चाकरमान्यांना दररोज सकाळी आणि रात्री असे दिवसातून दोन वेळा मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिवसाला तब्बल 250 ते 300 डब्यांचे वितरण करण्यात येत असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या स्वच्छ जागेत सकाळ-सायंकाळी हे भोजन तयार करण्यात येत असून यासाठी उच्च प्रतीचे पदार्थ वापरण्यात येतात, असे सांगताना संकटात असलेल्या व्यक्तींना मदत करणे मंडळाचे कर्तव्य असून वैयक्तिक प्रसिद्धीपासून सर्वच जण चार हात दूरच असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply