अलिबाग : प्रतिनिधी
उन्हाळा असो वा पावसाळा अलिबाग तालुक्यातील रेवस पाणीपुरवठा योजनेचा दुष्काळ काही संपत नाही. गेल्या 15 दिवसांत या योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकर्यांना पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. आज-उद्या अशी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी योजनांतून किमान एप्रिलपर्यंत तरी पाणी अपेक्षित आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ज्या तालुक्यात एमआयडीसीचे पाणी पुरविले जाते, त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगर परिषद आणि अनेक गावे समाविष्ट आहेत. याच एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली रेवस पाणीपुरवठा योजना आता 30 वर्षांहून अधिक वयाची झाली आहे. रेवस 1 व रेवस 2 अशा दोन भागात ती राबविली गेली. काही वर्षानंतर ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. दरम्यानच्या काळात योजनेच्या माध्यमातून विविध गावात रेवस योजनेच्या पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. त्यामुळे आपल्या गावचा, ग्रामपंचायतीचा पाणी प्रश्न सुटला म्हणून गावकरी खुष झाले. नव्याचे नऊ दिवस या म्हणीनुसार थोडे दिवस टाक्या ओल्या झाल्या आणि त्यानंतर त्या ज्या कोरड्या पडल्या, त्या फारशा ओल्या झाल्या नाहीत. परिणामी गावकर्यांना पाण्यासाठी पुन्हा वणवण करावी लागली. रेवस पाणीपुरवठा योजनेचा एक भाग म्हणून काही गावांसाठी भारत निर्माण योजना आखण्यात आली. पण ही योजनादेखील रेवसकरांची तहान भागविण्यासाठी उपयोगात येत नाही. धोकवडे आणि बोडणी येथे बांधण्यात आलेल्या काही हजार लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्या या धरण उशाशी पण कोरड घशाशी या भूमिकेत आहेत. बोडणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकत आहेत. ही भटकंती कधी थांबणार, असा सवाल विचारला जात आहे.
घरोघरी पाणी देण्याची मागणी रेवस योजनेत काही गावात घरोघरी नळ पाणी योजना राबविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच गावांना ही योजना राबवावी, योजनेची पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी आणि योग्य नियोजन करून ग्रामपंचायतीतील गावकर्यांना, घरोघरी पाणी द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.