छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रयतेची काळजी घेतली जात असे. महाराज आपल्या सैनिकांना रयतेची काळजी घेण्यासाठी अनेक सूचना देत असल्याची उदाहरणे आपण वाचली आहेत. पण छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सेनेच्या राज्यात मात्र रयतेला मोगलांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देण्याचे काम केले जात आहे. पनवेलमध्ये महावितरणचे कर्मचारी मोगली सैनिकांप्रमाणे वागत आहेत. वीज बिल भरल्यानंतरही ग्राहकांचा वीज पुरवठा तोडून त्यांचा छळ करण्याचा आसुरी आनंद घेताना वायरमनरूपी सैनिक दिसत आहेत. त्यामुळे पनवेलकर नागरिक महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा पुरस्कार केल्यावर भारतात शासकीय देयके ऑनलाइन भरली जातात. आपले सर्व व्यवहार डिजीटल झाले, म्हणून मिरवणार्या महावितरणकडे मात्र ग्राहकाने डिजिटल पेमेंट केल्यावर ते वेळेवर ग्राहकाच्या नावे जमा तर होत नाहीच शिवाय ग्राहकाला कोणतीही सूचना न देता किंवा त्याने वीज बिल भरले नाही म्हणून वरिष्ठांचे आदेश आहेत, सांगत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीज बिले आली आहेत. नोकरी, धंदा नसल्याने काहींनी अद्याप पूर्ण विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीज बिले दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली असताना राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकबाकी असल्यामुळे सरकारने आता वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं कारणही देण्यात आले आहे. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकीत असल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीज ग्राहकांना अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये थकबाकी भरण्याचे आवाहन करून 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. नोटीसची मुदत 30 जानेवारीला संपली, त्यानंतर वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुरू झाला आहे.
नवीन पनवेलमधील गिनी पार्क या सोसायटीचे बँक खाते आंध्रा बँकमध्ये होते. सदर बँक युनियन बँकेमध्ये विलीन झाल्याने नवीन चेक बुक उपलब्ध झाले नाही. महावितरणच्या अधिकार्यांना विचारून सोसायटीने दोन मीटरची बिले एनएफटीद्वारे भरली. महावितरणच्या कर्मचार्यांना त्याची पावतीही दाखवली होती. पण काही दिवसांनी त्यातील एका मीटरच्या बिलाची भरलेली रक्कम महावितरणने पुन्हा सोसायटीच्या खात्यात परत पाठवली. ही रक्कम का परत पाठवली, याची कोणतीही माहिती किंवा सूचना देण्यात आली नाही. नवीन बिलात पुन्हा ती रक्कम आल्यावर बँक खात्यात रक्कम परत आल्याचे सोसायटीच्या पदाधिकार्यांना समजले. सोसायटीने सकाळी बिल भरल्यानंतर त्याची चौकशी न करता सोसायटीच्या लिफ्टचा वीज पुरवठा कोणतीही चौकशी न करता किंवा रखवालदाराला न सांगताच तोडण्यात आला. त्यामुळे सोसायटीतील लिफ्ट बंद पडली. त्यामुळे सोसायटीतील अनेक आजारी आणि वृध्द माणसांचे हाल झाले. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला आसावा, असे वाटल्याने तो दुरुस्त करण्यासाठी कंपनीचा माणूस आल्यानंतर वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आले.
याबाबत सोसायटीच्या पदाधिकार्यांनी महावितरणच्या सेक्टर 15मधील कार्यालयात फोन केल्यानंतर तुमचा वीज पुरवठा बिल न भरल्याने तोडल्याचे सांगण्यात आले. सोसायटीने त्यांना बिल भरल्याचे सांगितल्यावर त्यांनी पावती घेऊन बोलावले. त्यानंतर तासाभराने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
महावितरणने आपल्या कर्मचार्यांना थकबाकीदारांची यादी दिली आहे. या यादीत नाव असलेल्या ठिकाणी गेल्यावर प्रथम त्याने बिल भरले आहे का, नाही याची खात्री करून नंतरच बिल भरले नसल्यास वीज पुरवठा तोडणे आवश्यक आहे. मग अशी खात्री न करताच चोरासारखे येऊन वीज पुरवठा का तोडला जात आहे, याचा खुलासा महावितरणाचे अधिकारी देणार की मंत्री महोदय करणार असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
पनवेलमध्ये एका सोसायटीत रहाणारे सहा माणसांचे कुटुंब. घरात नऊ वर्षाच्या छोट्यापासून 90 वर्षाच्या पणजीपर्यंतची सहा माणसे. कर्त्यापुरुषाचा अपघातात मृत्यू झाल्याने ती, तिची दोन लहान मुले, सासू, सासरे आणि 90वर्षांची आजेसासू. ती खाजगी स्कूलमध्ये नोकरी करून घर चालवत होती. लॉकडाऊनमुळे नोकरीही गेली. आजे सासुला ऑक्सीजन द्यावा लागतो, म्हणून मित्र – मैत्रिणींनी छोटे मशीन भेट दिलेले आहे. लॉकडाऊनच्या काळातील भरमसाठ बिल तिला पाठवण्यात आले. या बिलात एका महिन्याचे युनिट दोनदा घेतले आहेत. ते बिल दुरुस्त करण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली, पण त्याचे काहीच न करता बिल भरण्यास सांगितले. तिने नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन काही रक्कम भरली. बिल दुरुस्त केले तर 3-4 हजार रुपये कमी होतील पण त्याकडे महावितरण कर्मचारी लक्षच देत नाहीत. सगळे बिल ताबडतोब भरा, नाहीतर वीज तोडू म्हणून धमकी दिली जात आहे. वीज तोडली तर ऑक्सीजन अभावी आजेसासुचे काही बरे वाईट झाले तर त्याची जवाबदारी हे वीज कर्मचारी घेणार की त्यांचे बादशहा सलामत घेणार असा प्रश्न तिला पडला आहे.
-नितीन देशमुख, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper