Breaking News

राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत सतबीर, स्वस्तीला सुवर्णपदक

पनवेल ः प्रतिनिधी
25व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मास स्टार्ट शर्यतीत पुरुष गटात सेनादलाचा सतबीर सिंग, तर महिला गटात ओडिशाची स्वस्ती सिंग यांनी वेगवान कामगिरीची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले.
पनवेल येथे महामार्गावर भारतीय सायकलिंग संघटनेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेत पुरुषांची 100 किमी शर्यत सेनादलाच्या सतबीर सिंगने जिंकली. ताशी 38.90 किमी असा वेग राखताना त्याने दोन तास 34 मिनिट 14.081 सेकंद अशी वेळ दिली. हरयाणाचा विजय बोरा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. अवघ्या काही सेकंदाने त्याचे सुवर्णपदक हुकले. दोघांनी अगदी एकाच वेळेस अंतिम रेषा गाठली होती, पण एका सेकंदाच्या फरकाने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रेल्वेचा अरविंद पन्वर कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
महिलांची 60 किमी अंतराची शर्यत ओडिशाच्या स्वस्ती सिंगने बाजी मारली. तिने दोन तास 25.462 सेकंद अशी वेळ देत ही शर्यत जिंकली. कर्नाटकाची दनम्मा चिचचाखंडी हिने रौप्य, तर रेल्वेच्या कोमल देशमुखने कांस्यपदक मिळविले.
कुमार गटात मुलांची शर्यतही कमालीची चुरशीची झाली. एकूण 80 किमी अंतराची शर्यत पंजाबच्या विश्वजित सिंग याने एक तास 56 मिनिट 03.103 सेकंदाने जिंकली. त्याने आव्हानवीर सेनादलाच्या मुला रामला (एक तास 56 मिनिट 22.238 सेकंद) अगदी अंतिम रेषेवर मागे टाकले. राजस्थानचा आयुष झाकर कांस्यपदक विजेता ठरला.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply