Breaking News

सचिन वाझेंना अटक करा!

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद

मुंबई ः प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद
मंगळवारी (दि. 9) विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखला देत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला आहे. त्यामुळे वाझे यांना तत्काळ निलंबित करून अटक करा, अशी मागणी फडणवीसांसह भाजपने केली.
विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. वाझे यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, या प्रकरणी वाझे यांना अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. या वेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मनसुख हिरेन यांच्याबाबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. हिरेन यांच्या पत्नीने जी तक्रार दिलेली आहे त्याचा एटीएस तपास करेल. विरोधी पक्षाकडे जास्तीचे
पुरावे असतील, तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत.
यावर फडणवीस यांनी पुन्हा गृहमंत्र्यांना धारेवर धरले. सचिन वाझे हा पोलीस अधिकारी एका पक्षाशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री त्याला पाठीशी घालत आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे म्हणून अपराध्याला पाठीशी घालणे योग्य नव्हे. सचिन वाझे यांना त्वरित निलंबित करून अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. उपलब्ध पुरावे हे वाझे यांच्यावर कारवाईसाठी पुरेसे आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून तत्काळ अटक करा, असा पुनरूच्चार फडणवीस यांनी केला. या मागणीनंतर भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.
या वेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. पटोलेंच्या प्रश्नानंतर फडणवीस आक्रमक झाले. सरकारने माझी चौकशी करावीच. मी सीडीआर मिळवला, पण खून केला त्याला पाठीशी का घालता? तुम्ही मला चौकशीची धमकी देत आहात का?, सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. या प्रकरणात तुम्ही शोधणार नाहीत त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.
‘मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी निर्णय बदलला’
मुंबई ः मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना हटवण्याचे गृहमंत्र्यांनी अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत कबूल केले, मात्र नंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी निर्णय बदलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला. सरकार वाझेंना का पाठीशी घालतेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
या वेळी फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अटक झाली, तर सरकारमधील कोणा कोणाची नावे समोर येतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार वाझेला पाठीशी घालत असून सभागृहापेक्षा हा अधिकारी मोठा आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला, तसेच विरोधी पक्षनेत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताहेत, पण आम्ही घाबरणार्‍यातील नाही व सत्य बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असेदेखील फडणवीस म्हणाले.
मनसुख हिरेन यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब मी सभागृहात वाचून दाखवला, ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. हिरेन यांची जी गाडी स्फोटके ठेवून घटनेकरिता वापरण्यात आली होती ती गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. एवढेच नाही तर त्यांचा तपास हा केवळ वाझे यांनी केला आणि तीन दिवस रोज ते वाझेंसोबत सकाळी जायचे व रात्री यायचे, हेही त्यांच्या पत्नीने सांगितले आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply