मुंबई ः प्रतिनिधी
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. वझे यांना क्राइम ब्रांचमधून सुरुवातीला नियंत्रण कक्षात पाठवले गेले होते. आता त्यांची रवानगी नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष-1मध्ये करण्यात आली आहे. मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अशातच काही दिवसांपूर्वी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर हत्येचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठीशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे वाझे यांची कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिन वाझे यांची आधी नागरी सुविधा केंद्रात विभागात बदली करण्यात आली होती. या संदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते, मात्र आता पुन्हा त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत कागदोपत्री बदली करण्यात आली आहे.