पनवेल ः वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन दिवसांत खारघर आणि तुर्भे येथे झालेल्या दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक तरुण गंभीर जखमीही झाला. खारघर येथील अपघातातील ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ऋषिकेश हिवराळे (22) या तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. कोपरखैरणे सेक्टर-19मध्ये राहणारा ऋषिकेश फोटोग्राफी करीत होता. शनिवारी ऋषिकेश व त्याच्या मित्रांनी पनवेल येथील फार्म हाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी शनिवारी सायंकाळी ते मोटरसायकल, स्कुटी व कारने पनवेलच्या दिशेने जात होते. खारघर येथील हिरानंदानी उड्डाणपुलावर आले असता त्यांच्या मोटरसायकलला ट्रकची धडक बसली. त्यामुळे पाठीमागे बसलेला ऋषिकेश खाली पडून ट्रकच्या चाकाखाली आला. या अपघातात ऋषिकेशसह यश टेंभे हाही जखमी झाल्याने त्यांच्या मित्रांनी या दोघांना प्रथम खारघरमधील खासगी रुग्णालयात व त्यानंतर वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचार सुरू असताना रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी खारघर पोलिसांनी ट्रकचालक शिवाजी कदमवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
तसेच रविवारी रात्री उशिरा तुर्भे नाका इंदिरानगर मार्गावर झालेल्या दुसर्या अपघातात रोहन जाधव (18) या तरुणाचा मृत्यू झाला. तुर्भे नाका येथील हनुमाननगर येथे राहणारा रोहन अकरावीत शिकत होता. रविवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास तो स्कुटीवरून फेरफटका मारण्यासाठी इंदिरानगर येथे गेला होता. या वेळी स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनाला धडकली. यात रोहन गंभीर जखमी झाल्याने त्याला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातास रोहन स्वत: जबाबदार असल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पनवेल ः भरधाव वेगाने जाणार्या कंटेनरने जेडब्ल्यूआर कंपनीसमोर मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कंटेनरचालक बबलू प्रजापती (32) हा आपल्या ताब्यातील कंटेनर पनवेल ते उरण मार्गे नेताना जेडब्ल्यूआर कंपनीसमोर मोटरसायकलीस धडक दिली. या अपघातात अश्विनी दोरूगडे ह्या महिलेचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper