मोहोपाडा ः प्रतिनिधी
पंचायत समितीच्या निधीतून वासांबे मोहोपाडा हद्दीतील नवीन पोसरी येथील माऊली अपार्टमेंटनजीकच्या चौकातील एलएडी लाइट हायमास्ट पोलसह गायब झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. असा प्रकार करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. रसायनीतील वासांबे मोहोपाडा व नवीन पोसरी परिसरातील मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहेत. नवीन पोसरी येथील माऊली अपार्टमेंट चौकात याअगोदर नागरिकांच्या आग्रहाखातर येथील स्थानिक पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून एलएडी हायमास्ट पोल लावल्याने परिसर प्रकाशमय झाला होता. या वेळी नागरिकांची समस्या जाणून नवीन पोसरी चौकात हायमास्ट लागल्याने अनेकांनी धन्यवादही दिले, परंतु नुकताच नवीन पोसरी चौकातील हायमास्ट एलएडी पोलसह जागेवरून गायब झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे चौकात अंधाराचे साम्राज्य पसरले. चौकातून प्रवास करताना महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचांशी संवाद साधला असता आम्ही एलएडी हायमास्ट पोल चोरी करणार्यांवर कारवाई करण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याला पत्र देणार असल्याचे सरपंच ताई पुंडलिक पवार व उपसरपंच राकेश बाबूराव खारकर यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper