Breaking News

पहिल्याच वन डेत भारत तीनशेपार; धवन, विराट, पांड्या, राहुल यांची अर्धशतके

पुणे ः प्रतिनिधी

कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने मंगळवारी (दि. 23) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला प्रारंभ केला. पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने  संयमी सुरुवात केली आणि 13व्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित झाला. त्याने 42 चेंडूंत चार चौकारांसह 28 धावांची संथ खेळी केली. यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली. सामन्याच्या 24व्या षटकात या दोघांनी भारताला शंभरीपार नेले, तर याच षटकात धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. धवननंतर विराटनेही झटपट अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला बाद केले. त्याने सहा चौकारांसह 56 धावा केल्या. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. धवनला शतकाने हुलकावणी दिली. स्टोक्सला फटका खेळताना धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार ठोकले. धवननंतर आलेल्या हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो एक धाव काढून बाद झाला. हार्दिक स्टोक्सचा तिसरा बळी ठरला. आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. अखेर वनडे पदार्पण केलेला कृणाल पांड्या संघासाठी धावून आला. त्याने धावांसाठी झगडत असलेल्या के. एल. राहुलला हाताशी घेत आक्रमक फलंदाजी केली. पदार्पणाच्या सामन्यात कृणालने दमदार अर्धशतक ठोकले. कृणालनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. कृणालने 31 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 58, तर राहुलने 43 चेंडूत प्रत्येकी चार चौकार व षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने तीन, तर मार्क वूडने दोन बळी टिपले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply