‘फार्मा पार्क’साठी सक्तीचे भूसंपादन करणार नसल्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन
अलिबाग : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प उभारण्याचा घाट राज्य शासनाने घातला होता, मात्र त्यास बाधित शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली. यानंतर आता रोहा तालुक्यातील फार्मा पार्कबाधित शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. 1) राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून या प्रकल्पाला विरोध असल्याबाबत निवेदन दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांवर भूसंपादनाची सक्ती करण्यात येणार नाही, असे आश्वासन ना. देसाई यांनी शेतकरी प्रतिनिधींना दिले.
केंद्र सरकारने अद्याप या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिलेली नाही. तरीही भूसंपादन प्रक्रियेची घाई का केली जात आहे, असा प्रश्न या वेळी झालेल्या चर्चेत उपस्थित करण्यात आला, तसेच 2013च्या कायद्यानुसार भूसंपादन सुरू नाही व त्या कायद्यानुसार आवश्यक अधिसूचना काढण्यात आली आहे का याबद्दल माहिती अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जाच्या उत्तरात एमआयडीसीने आमच्याकडे कायद्याची प्रत उपलब्ध नाही, असे म्हटले आहे, असे सांगून उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी त्याबद्दल निषेध व्यक्त केला.
मंत्रिमहोदयांनी शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले व कोणत्याही परिस्थितीत भूसंपादनाची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले, तसेच इकोसेन्सिटिव्ह झोनमधील गावात भूसंपादन करणार नाही व निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिले जाईल, असेही सांगितले.
या वेळी अतुल पाटील, पांडुरंग तांबडे, उमेश ठाकूर, अनिता भोईर आदी शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper