Breaking News

उरणमध्ये कोरोनाची उसळी; वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालये हाऊसफुल्ल

उरण : वार्ताहर

नागरिकांचा बेफिकीरपणा, सण, समारंभात शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून होणारी गर्दी आणि कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही फक्त भीतीमुळे रुग्णांकडून उपचारासाठी होत असलेली अक्षम्य टाळाटाळ, यामुळे उरणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांमुळे सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेडही उपलब्ध राहिलेले नाहीत. कोरोनाच्या उसळीमुळे मात्र उरणमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील बहुतेक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वाढतच चालला आहे. त्याला उरण तालुकाही अपवाद राहिलेला नाही. उरणमध्ये साखरपुडा, हळदी, लग्न, वाढदिवस कोणताही समारंभ असो शेकडोंची गर्दी ठरलेलीच. त्यामुळे उरणमध्ये अधिक चिंताजनक वातावरण आहे. घरामध्ये अडकून पडलेले नागरिक नुकतेच बाहेर पडू लागले आहेत, मात्र बाहेर पडताना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले निर्देश पाळले जात नाहीत. यामुळे रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. उरण तालुक्यामध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळेस सध्या नाक्या नाक्यावर, बाजारात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. उरणमध्ये कुणालाच कोरोना विषाणूची भीती नसल्याचे दिसून येत आहे. येथील नाक्या नाक्यावर सकाळच्या वेळेत अलोट गर्दी पाहायला मिळत असून, या गर्दीमधून आरोग्य विभागाने कोव्हीड- 19 बाबत दिलेल्या नियमावलीची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे येथे कुणाला कोरोनाची भीती नसल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळल्यामुळे रुग्ण संख्येत भर पडत चालली आहे. यामध्ये नोकरदार वर्ग आणि परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. या गर्दीमधील नागरिक कोणतेही नियम पाळत नसून, बेधकपणे वावर करत आहेत. उरण शहराचा भाग असणार्‍या चारफाटा या ठिकाणी दररोज सकाळी शेकडो परप्रांतीय मजूर रोजंदारीसाठी गर्दी करून असतात. या वेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर केला जात नाही, तर येथील रिक्षा आणि खाजगी वाहतूक सेवादेखील कोणतेही नियम पाळत नसून, क्षमतेपेक्षा प्रवाशी वाहतूक करून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यातच कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही केवळ गैरसमज आणि भीतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. कोरोनाची टेस्ट करुन घेण्यासही धजावत नाहीत, असे संशयित रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी कोरोना स्पेडर बॉम्ब ठरू लागले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच नियम धाब्यावर बसवून होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. उरणमध्ये 31 मार्चपासून या पाच दिवसात 85 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उरणमध्ये सध्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची 142 पर्यंत पोहचली असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. या वाढत्या रुग्णांमुळे आज सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध राहिलेले नाहीत. ही बाब उरणकरांसाठी निश्चितपणे चिंताजनक आहे. यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती कोरोना समन्वयक यांनी दिली. रविवारी जीटीपीएस कॉलनी येथे जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता पकंज नागदेवता यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात आली. शहर अथवा ग्रामीण भागात कोरोना सदृश्य कोणतेही लक्षणे कोणत्याही व्यक्तीला जाणवली, तर अशा व्यक्तीने तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply