Breaking News

पनवेल मनपाच्या महासभेत गोंधळ घालणार्‍या 15 नगरसेवकांचे निलंबन

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 5) झालेल्या महासभेत गोंधळ घालणार्‍या नगरसेवकांचे  15 दिवस निलंबन करण्यात आले आहे. मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी ऑनलाइन बोलविण्यात आलेल्या महापालिकेच्या या विशेष सभेत
विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून सभागृहात हजर राहत गोंधळ घातला. याबद्दल या गोंधळी नगरसेवकांचे निलंबन करण्यात येऊन पोलिसांमार्फत त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. दरम्यान, या गोंधळामुळे या सभेचे कामकाज वेळेअभावी तहकूब करण्यात आले असून, ही तहकूब सभा मंगळवारी होणार आहे
पनवेल महापालिकेची महासभा मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी ऑनलाइन पद्धतीने बोलाविण्यात आली होती. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, प्रभाग अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, उपायुक्त संजय शिंदे, नगर सचिव यांना सभागृहात उपस्थित राहण्यास परवानगी होती, मात्र या वेळी विरोधी पक्षाचे 14 नगरसेवक गणेश कडू यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात येऊन बसले. त्यांना विरोधी पक्षनेत्यांव्यतिरिक्त सभागृहाबाहेर जाण्यास महापौरांनी सांगितले, पण त्यांनी हट्ट सुरूच ठेवल्याने सभा तहकूब करण्यात आली.
पुन्हा सभा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांना बरे नसल्याने त्यांच्या बदली एका सदस्याला बसण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगून, इतरांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. तरीही विरोधक बाहेर न गेल्याने पुन्हा सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा सुरू झाल्यावर 15 सदस्यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगून, त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात येऊन ते बाहेर जाईपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. विरोधक बाहेर जाण्यास तयार नसल्याने अखेरीस सुरक्षा रक्षकांना त्यांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांना बोलवण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लांडगे यांनी विरोधी सदस्यांना मला महापौरांचा लेखी आदेश असल्याने तुम्हाला बाहेर काढणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना सभागृहाबाहेर नेले.
उपायुक्त संजय शिंदे यांनी या वेळी महापालिकेने मालमत्ता कर कसा लावला आहे व त्यासाठी नेमलेल्या एजन्सीने सर्वेक्षण कशा प्रकारे केले याची माहिती दिली. याशिवाय इतर महापालिकांच्या तुलनेने पनवेल महपालिकेचा मालमत्ता कर कसा कमी आहे याचे तुलनात्मक विवेचन केले. त्यानंतर महापौरांनी आज सभेचा वेळ फुकट गेला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांना त्यावर बोलायचे आहे, पण कोरोनाचे नियम पाळण्यासाठी सभा जास्त वेळ सुरू ठेवणे शक्य नसल्याने आजची सभा तहकूब करून उद्या मंगळवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या ऑनलाइन सभेत निलंबित सदस्यांना भाग घेता येणार नाही.
हे आहेत निलंबित सदस्य
लीना गरड, गणेश कडू, शंकर पदू म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, उज्ज्वला पाटील, विष्णू नारायण जोशी, प्रिया विजय भोईर, प्रज्योती प्रकाश म्हात्रे, गोपाळ रामा भगत, कमल महादेव कदम, रवींद्र अनंत भगत, विजय मनोहर खानावकर, सारिका अतुल भगत, सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज.


मालमत्ताकराबाबत जनभावनांचा विचार करावा ः परेश ठाकूर
गोंधळानंतर सभा सुरू झाल्यावर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या मालमत्ता कराबाबत आमची सगळ्यांच्या भावना लोकांना त्याचा त्रास होऊ नये अशीच असून, सत्ताधारी नगरसेवकांनी आपल्या भावना आणि मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. त्या मी आपणाकडे देतो. त्याचा विचार करावा, अशी विनंती महापौरांना करून या मागण्यांची फाइल महापौरांना सुपूर्द केली.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply