Breaking News

‘मालमत्ता कराविषयी विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल’

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादला जावा याचे आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही, मात्र विरोधक या विषयाचा बागलबूवा करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सातत्याने दिसत आले आहे. वास्तविक, मालमत्ता कर आकारणी प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असताना विरोधक नाहक सत्ताधार्‍यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 5) मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोशल डिस्टन्सचे नियम पाळून झालेल्या या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी उपस्थित होते. आज मालमत्ता करासंदर्भात ऑनलाइन विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. सभा ऑनलाइन असतानाही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात प्रवेश केला आणि सभा होऊ न देता फक्त गोंधळ घातला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या या अत्यंत निंदनीय वागणुकीचा या वेळी परेश ठाकूर यांनी सत्ताधारी भाजप-आरपीआयतर्फे निषेध व्यक्त केला.
सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, मुंबई, नवी मुंबईला जोडून असलेल्या पनवेल शहर व परिसरात आलेले विविध प्रकल्प आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन येथील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल नगर परिषदेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महापालिका आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील नागरिकांसाठी नवीन अशी महापालिका होती. सुरुवातीला प्रशासकीय कारभार नागरिकांच्या अपेक्षेनुसार झाला नसला तरी आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या दृष्टिकोनातून विकास होईल की नाही, अशा प्रकारची भीती पसरवली जात होती, मात्र यामध्ये आम्ही प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले. स्वतः गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत तेथील समस्या, अडचणी जाऊन घेतल्या. ’नो सर्व्हिस नो टॅक्स’ अशी विरोधक वलग्ना करीत होते, परंतु महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्याचे काम होत आहे.
या अनुषंगाने पनवेल शहरात 50 कोटी रुपयांची विकासकामे काढण्यात आली असून, या कामांची निविदा ऑनलाइन प्रसिद्ध झाली आहेत. ग्रामीण भागातील गावातील 39 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्याचीही निविदा येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे, तसेच कळंबोली, खारघर या सिडको नोडमधील सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या मैदाने, बगीचे, उद्यानांच्या विकासाकरिता 22 कोटीच्या कामांना मंजुरी मागील महिन्यात मिळाली आहे. वेळोवेळी जनताभिमुख अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्याचबरोबर पनवेल व इतर शहरी भागातही विकासाची कामे सत्ताधारी पक्षाच्या प्रयत्नातून होत आहेत. पनवेल महापालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर आकृतिबंध आराखड्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे मागणी आणि त्या संदर्भातील सतत पाठपुरावा केला. त्यानुसार आकृतिबंध आराखडा मंजूर झाला आहे. त्यामुळे महापालिका आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला, असे परेश ठाकूर यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील देवीचापाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पाले खुर्द, ढोंगर्‍याचा पाडा, टेंभोडे, बीड, आडिवली, रोहिजण, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसूडगाव, धानसर, धरणागाव धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले व कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील रहिवाशांना फार मोठा दिलासा आणि न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. अशी एक ना अनेक कामे आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून होत असताना विरोधकांना मात्र याचे श्रेय मिळत नसल्याने त्यांच्या मनात सल निर्माण झाली आहे. पहिल्या निवडणुकीत मतदारांनी नाकारून दारुण पराभव केल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समोर कसे जाणार याची चिंता विरोधकांच्या मनात घर करून बसली आहे. म्हणूनच कुठलाही मुद्दा उरला नसल्याने विरोधकांनी नागरिकांना वेठीस धरून मालमत्ता कराचा विषय पराचा कावळा करून हाती घेतला आहे. मालमत्ता कर हा विषयच प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि त्याला अनुसरून सत्ताधार्‍यांची नाहक बदनामी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, तो थांबण्याची गरज आहे, असे त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
सर्व्हिस देतो म्हणूनच मालमत्ता कर घेतला जाणार आहे आणि नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही ही विशेष सभा बोलावली होती, मात्र विरोधकांना ही महासभा होऊन द्यायची नव्हती. म्हणून त्यांनी ऑनलाइन सभेत मत न मांडता थेट सभागृहात कोरोना नियमांचे तसेच राज्य सरकारच्या नियमांची पायमल्ली करून प्रवेश केला आणि गदारोळ माजवला, असा आरोप परेश ठाकूर यांनी केला. 2017 साली महापालिका निवडणुकीत ग्रामीण भागात कर वाढवणार नाही हे वचन दिले होते आणि ते आम्ही वचन पाळणार असे त्यांनी आवर्जून सांगितले. नगरसेविका लीना गरड यांना पक्षाने वेळोवेळी जबाबदारी, महापालिकेचे महिला व बालकल्याण सभापतीपदही दिले, पक्षाने सन्मान केला, मात्र त्यांना जनतेची कदर नाही तर स्टंटबाजी करीत स्वतःची प्रसिद्धी आणि लोकांना भडकविण्याचे काम त्या करीत आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कर्नाळा बँकेचा घोटाळा लोकांसमोर आल्यानंतर तो लपविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून वारंवार केला गेला. हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत असल्यामुळे तो लपविण्याकरिता महाविकास आघाडी मालमत्ता कराचा विषय जनतेवर लादून भडकाभडकवी करीत आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते (पनवेल महानगरपालिका)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply