Breaking News

लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून विनवण्या

पनवेल : प्रतिनिधी

’ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी रात्रीपासून नवीन नियमावली आलेल्याने पनवेल स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त लावून लोकलने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत नसणार्याना स्टेशनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण साहेब, मला लोकलने प्रवास करू द्या. मी मागच्यावेळी हेच पत्र दाखवून प्रवास केला होता, असे सांगत अनेक जण पनवेल स्टेशनवर शुक्रवारी (दि. 23) पोलिसांजवळ वाद घालताना दिसत होते.  ’ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवार (दि. 22) रात्री 8 वाजल्यापासून  सुधारित नियमावली लागू करण्यात आल्याने सामान्य माणसाला लोकल प्रवास बंद करण्यात आला आहे. पनवेल स्टेशनवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून आयडी पाहिल्याशिवाय कोणालाच प्रवेश दिला जात नाही. अनेक जण आपली जुनी ओळख पत्रे किंवा एखाद्या रुग्णालयातील सेवा पुरवणार्‍या ठेकेदाराचे पत्र दाखवून आपल्याला सोडावे म्हणून वाद घालताना दिसले. एक तरूण आयकर विभागात 2020 मध्ये कंत्राटी कामावर होता. ते पत्र घेऊन मला अद्याप आयकर विभागाने ओळखपत्र दिलेले नाही तुम्ही मला जाऊ द्या म्हणून सांगत होता, पण पोलीस त्याला सोडत नव्हते.  अनेक ज्येष्ठ नागरिक ही वेगवेगळी कारणे सांगून लोकलने जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. एक महिला आम्हाला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजी विकण्याची परवानगी आहे. त्यामुळे मला सानपाड्याला जाण्यास परवानगी द्या असे सांगत होती, पण पोलीस कोणाला प्रवास करता येईल त्याची लिस्ट दाखवून यामध्ये तुम्ही बसत नसल्याने त्यांना प्रवेश नाकारत होते. पनवेल महापालिकेने परराज्यातून येणार्‍या ट्रेनमधील प्रवाशांची  अँटीजन टेस्ट करण्यासाठी डॉक्टर आणि एक सहाय्यक बसवले आहेत. त्याठिकाणी रोज चार ते सहा पॉझिटिव्ह आढळत असल्याचे समजले. मुख्य गेटमधून बाहेर पडल्यास टेस्ट होते, म्हणून अनेक जण दुसर्‍या बाजूने किंवा टेस्टसाठी बसलेल्या डॉक्टरांच्या मागील बाजूने किंवा आपण कोकणातून आल्याचे सांगून निघून जातात.  त्यामुळे त्यांची तपासणी होऊ शकत नसल्याचे या वेळी दिसून आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply