Breaking News

उरणमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद

उरण ः वार्ताहर

कोरोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या दोन दिवसांच्या कडकडीत बंदला उरण तालुक्यामधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र उरण बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. त्यामुळे उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली होती. 37 ते 76पर्यंत रुग्णांची संख्या गेली होती. शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवल्याने सोमवारी फक्त 12 कोरोना रुग्ण आढळून आले, तर 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे नागाव येथील तीन, तर बोरी (उरण) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. या दोन दिवसांत सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी हॉटेल, जासई,  चिरनेर, उरण चारफाटा, राघोबा मंदिर, कोट नाका येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाचा दुसर्‍या लाटेचा प्रसार वाढू नये यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत, मात्र नागरिकांकडून गर्दी केली जात होती. त्यामुळे शासनाकडून शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला राज्यभरासह उरण तालुक्यातूनही उत्तम प्रतिसाद लाभला. उरण तालुक्यातील आणि बाजारपेठेतील मेडिकल वगळता सर्वच दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिक कोठेही विनाकारण फिरताना दिसत नव्हते. रस्तेही सामसूम होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply