Breaking News

पनवेल मनपाकडून एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. या अनुषंगाने  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार असून, शनिवारी त्या अनुषंगाने सुरुवातीला 100 आयसीयू बेड उपलब्ध झाले आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर बेडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, एमजीएम हॉस्पिटलचे वरिष्ठ डिन डॉ. नरशेट्टी, डॉ. भुसारे यांच्या उपस्थितीत हे ऑक्सिजन बेड शनिवारी (दि. 1) सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
एमजीएम कामोठे रुग्णालयात आणखी 200 बेडची उपलब्धता करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याचबरोबर या संदर्भात वारंवार पाठपुरावाही केला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्याबरोबरच त्यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली होती, तर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. 200 ऑक्सिजन बेडसाठी साहित्य खरेदीस येणार्‍या खर्चाला महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती.
या अनुषंगाने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी 100 बेड शनिवारी उपलब्ध झाले असून, 15 मेपर्यंत उर्वरित 100 आयसीयू बेडची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply