Breaking News

पनवेल मनपा हद्दीत ज्यादा लसींच्या पुरवठ्यासह अधिक केंद्रांना परवानगी द्या -नगरसेविका दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड-19च्या लसींचा पुरवठा करून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे.

नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम (कोवॅक्सिन व कोविशिल्ड) शासनाकडून राबविण्यात येत असुन, सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील अपुर्‍या लसीकरण साठ्याच्या अभावी थांबलेले असुन, काही ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस मिळूनही 45 दिवसांचा कालावधी पुर्ण होऊन सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लावूनही दुसरा डोस मिळाला नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच केंद्र सरकारकडून 18 ते 44च्या वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण करण्याचा निर्णय घेतलेला असून, यामुळे पालिकेच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास कोरोनाचा संसर्ग होऊन धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असुनही त्यांना लस मिळत नाही.

महानगरपालिकेच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर या परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकही येत असल्याने सध्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील गर्दी नियंत्रित करणे खूप अवघड होत असल्याने महापालिका हद्दीतील इतर ठिकाणीही लसीकरण केंद्रांना परवानगी मिळणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करण्यात यावा व लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीकोनातून जास्त लसीकरण केंद्रांना महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात यावी. या निवेदनाची प्रत माहितीस्तव रायगड जिल्हाधिकारी व आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठविण्यात आली आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply