पनवेल : रामप्रहर वृत्त
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून सात लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक आऊटडोर जिम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्याचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, खेळाडूंना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. लवकरच शासनाच्या विशेष निधीतून या तालुका क्रीडा संकुलाचे संपूर्ण अद्यावतीकरण करण्यात येणार असून, त्याद्वारे अधिक दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. खेळाच्या माध्यमातून तरुणांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमात येत्या एप्रिल महिन्यापासून क्रीडा संकुलात समर कॅम्प सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक सुमित झुंजारराव, माजी नगरसेविका सारिका भगत, गणेश म्हात्रे, सतीश पाटील, रूपेश नागवेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper