Breaking News

कर्जतमधील भिसेगाव-चारफाटा रस्त्याला अनेक विघ्ने; काम ठप्प

कर्जत : बातमीदार

शहरातील भिसेगाव ते चारफाटा या सुमारे 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी या रस्त्याने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यापासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटकाँक्रीटचा थर टाकला आहे, मात्र दुसर्‍या बाजूला फक्त खोदकाम केले असून, तेथील साकवचे काम अर्धवट आहे. त्यामुळे येथून स्थानिक प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक आणि पादचार्‍यांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. भिसेगाव-चारफाटा रस्त्यासाठी उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदकाम केले गेले. मात्र या खोदलेल्या रस्त्यावर तब्बल दोन महिने कोणतेही काम कर्जत नगर परिषदेकडून झाले नव्हते. पावसाळ्यात गणेशोत्सव  सुरु असताना रस्ता खोदल्याने तेथून एसटी वाहतूक बंद झाली, स्थानिक रिक्षा वाहतूक बंद पडली. या रस्त्याचे काम आतापर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र आठ महिन्यात या रस्त्याच्या केवळ एका बाजूच्या लेनचे काँक्रीटीकरण झाले आहे, ते देखील एका बाजूने पूर्ण झाले नाही. हे काम गेल्या महिनाभर बंद आहे. या रस्त्याच्या दुसर्‍या लेनचे काम कधी हातात घेणार? याबाबत नगर परिषदेकडून कोणतीही माहिती मिळत नाही. या रस्त्यावर चारफाट्याजवळ असलेल्या छोट्या पूलाचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल काय? असा सवाल जय अंबे रिक्षा चालक मालक संघटनेकडून विचारला जात आहे. कर्जत नगर परिषदेने निदान येत्या पावसाळ्यापूर्वी तरी या 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply