Breaking News

चक्रीवादळामुळे रायगडची वाताहत

खोपोली : प्रतिनिधी
चक्रीवादळाचा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला प्रचंड फटका बसला असून, अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले, तर आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिकांचीही हानी झाली आहे.
चक्रीवादळाने रविवारी संध्याकाळपासून खालापुरात हजेरी लावली. सुरुवातीला सौम्य स्वरूपात वारा व पाऊस सुरू झाला. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस आणि वार्‍याचा जोर मध्यरात्रीनंतर वाढल्याने गतवर्षी निसर्ग चक्रीवादळात सर्वाधिक नुकसान झालेल्या उंबरवीरा बीड खुर्द येथे रात्रीच तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत मंडल अधिकारी, तलाठी व उपसरपंच कुमार दिसले उपस्थित होते.
वाशिवली येथील हरिभाऊ गणपत पवार यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर सोसाट्याच्या वार्‍यात उडून सुरेश बारक्या भोईर यांच्या घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही झाडे हटविण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा झाला.
दरम्यान, काढणीला आलेला आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर सतत दोन वर्षे नुकसानीत जाणार्‍या वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्चा विटा भिजून नुकसान झाले आहे.
अशातच कोरोनाचा कहर सुरूच असल्याने खालापुरातील ऑक्सिजन पुरवणार्‍या कारखान्यातदेखील रात्रीच्या वेळेस तहसीलदार चप्पलवार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्या.
रोह्यात भातशेतीचे नुकसान
रोहा ः रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वार्‍याला सुरुवात झाली, तर रात्री अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पडला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे नागरिक सावध होते. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात वार्‍याला सुरुवात झाली. मध्यरात्री वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिक भयभीत झालेे. अशातच रात्री वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. निसर्ग चक्रीवादळाचे भय नागरिकांच्या आठवणीत असल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली.
रात्री आलेल्या वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर सोमवारी सकाळपासूनच वार्‍यासह पावसाची रिमझिम सुरू झाली. या पावसामुळे उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले आहे.
पेण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान
पेण ः अरबी समुद्रात घोंघावणार्‍या चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण रायगडला बसला असून, कोकण किनारपट्टीवरून वाटचाल करीत असलेल्या या वादळाने सकाळी पेणमध्ये 8 वाजल्यानंतर अचानक गती घेतली. या वादळात पेण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पेण तालुक्यात पावसाचा जोर कमी असला तरी सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळणे, विजेचे पोल पडणे, घरांवरील व सोसाट्यांचे पत्रे उडणे अशा घटना समोर आल्या आहेत. कटरच्या सहाय्याने झाडे तोडून बाजूला करण्याचे कार्य सुरू होते.
नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू असून, किती प्रमाणात नुकसान झाले आहे हे अद्याप सांगता येणार नाही, अशी माहिती तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply