Breaking News

चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका

पालकमंत्र्यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी

सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते. त्यामुळे ज्यांचे अस्तित्व सुतारवाडीपलीकडे नाही, ज्यांचा भाऊपण त्यांची साथ देत नाही अशा चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका. देशहितासाठी धनुष्यबाणावर मतदान करून अनंत गीतेरूपी देवमाणूस लोकसभेत पाठवा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले.

शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांची संयुक्त विजय संकल्प सभा अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी बोलताना पालकमंत्र्यांनी महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरेंवर सडकून टीका केली. या सभेला शिवसेना नेते महेंद्र दळवी, विजय कवळे, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा संघटक महेश मोहिते, सतिश धारप, सतिश लेले उपस्थित होते.

रायगडचा खासदार लोकांच्या जमिनी खरेदी करणारा नसावा. लोकांशी आत्मियतेने बोलणारा, देशाचा विचार करणारा असावा, असे म्हणत पालकमंत्री चव्हाण यांनी तटकरेंवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदीच ते देऊ शकतात. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक खासदार निवडून दिला पाहिजे. अनंत गीते हे साधे आहेत, लोकांशी तळमळीने बोलतात, देशाचा विचार करतात. त्यामुळे त्यांना निवडून द्यायला हवे. तटकरे निवडून गेले तरी त्यांना लोकसभेत बोलण्याची संधी मिळणार नाही. लोकसभेत खासदारांच्या संख्याबळाप्रमाणे बोलण्याची संधी दिली जाते. राष्ट्रवादीचे संख्याबळ किती आहे हे तुम्ही जाणून घ्या. त्यामुळे चुकीच्या माणसाला मतदान करू नका. देशावर प्रेम करत असाल, तर धनुष्यबाणाला मतदान करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply