Breaking News

चिरनेरच्या अक्कादेवी बंधार्याला गळती

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील निसर्ग उपेक्षित राहिला आहे. त्यात पर्यटकांना आकर्षित करणार्‍या अक्कादेवी बंधार्‍याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात बंधारा फुटला तर पाण्याचा लोंढा चिरनेर गावात शिरून रहिवाशांच्या जिवितास, भातशेतीस धोका निर्माण करू शकतो, अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई व रायगड येथील पर्यटनस्थळांमध्ये चिरनेर या निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या भूमीचाही समावेश आहे. अशा हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि महागणपती देवस्थानमुळे पावन झालेल्या चिरनेर या इतिहास प्रसिद्ध भूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, परंतु या पवित्र भूमीचा आणि नैसर्गिक संपत्तीचे पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर करण्याकडे उरण पंचायत समिती व जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले आहे. तरी आजही चिरनेरच्या डोंगररांगेत वड, साग, आंबा, जांभूळ, करवंद, रानकेळी, बिबळा सह इतर वूक्षसंपदेचा समावेश आहे. नाग, अजगर व इतर सरपटणारे साप, फुलपाखरे तसेच ससा, भेकर रानडुक्कर, मोर, रानमांजर, घोरपड, वानर व इतर अनेक प्राण्यांचाही जंगलात समावेश आहे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या पक्षी, प्राणी, वनसंपदेमुळे आणि पावसाळ्यात फेसाळून वाहणारा बंधारा पर्यटकांना आकर्षित करीत असतो.

येथील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी तसेच जागूत अशा महागणपती देवस्थान चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी वर्गाबरोबर हजारो भाविक, देशभक्त, निसर्ग अभ्यासक, पर्यटक आपआपल्या कुटुंबासह वर्षभर या परिसराला भेटी देत असतात. हा परिसर उरण पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिला आहे. येथील पर्यटनाचा विकास करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी निसर्गप्रेमी, पर्यटक करीत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply