Breaking News

पॅकेज म्हणा वा मदत, पण घोषणा तर करा -देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. महाड, चिपळूणनंतर ते आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील त्यांच्यासोबत आहेत. पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या दोघांनीही सरकारच्या कारभारवर आसूड ओढले. फडणवीस यांनी, राज्य सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का देत नाही, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांच्या मदतीच्या मागणीवर मी पॅकेज जाहीर करणारा नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी देखील लागलीच पलटवार केला. आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी. ती अद्याप आलेली नाही. नागरिक सातत्याने 2019च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती. एखादी आपत्ती आल्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा काळ असतो, ज्यात तातडीची कामं करावी लागतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये चिखल घुसतो. अंतर्वस्त्रापासून सर्व गोष्टी लोकांना आणाव्या लागतात. अशा परिस्थितीत ही तातडीची मदत आवश्यक असते. त्या कुटुंबांकडे तेवढेही पैसे नसतात. सरकारने अद्याप ती मदत दिलेली नाहीत. उशीर झाला आहे, पण आता तरी सरकारने मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

आजी माजी मुख्यमंत्री आमनेसामने

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराने आज मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना समोरा समोर आणले. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरी येथील कुंभार गल्ली येथे अचानक योगायोगाने समोरासमोर आले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply