पनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) रायगड जिल्हा दौरा होता. यावेळी झालेल्या जन आशिर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यातील या जन आशिर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी या यात्रेतून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांनी आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार केला. या यात्रेच्या अनुषंगाने जागोजागी औंक्षण, ढोल ताशे, ब्रास बँड, फटाक्यांच्या आतषबाजीत जनतेने भरभरून आशिर्वाद दिले. रायगड जिल्ह्यातील या जन आशिर्वाद यात्रेला अलिबाग येथून प्रारंभ झाला. पुढे पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथे रायगड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याने झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, वैकुंठ पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग या यात्रेत होता.
नामदार कपिल पाटील यांनी या यात्रेच्या अनुषंगाने म्हंटले कि, देशाच्या व राज्याच्या विकासासाठी येथील भूमिपुत्रांनी त्याग केला आहे. मी सुद्धा भूमिपुत्र आहे, त्यामुळे मला त्या प्रश्नांची जाण आहे. भूमीपुत्राला मंत्री केला आहे, त्यामुळे भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटितपणे काम करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावे यासाठी नुकताच कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीने भेट घेतली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन भूमिपुत्रांच्या भावनेचा आदर केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय देण्याची केंद्राने भूमिका घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हि मी प्रथम मागणी लोकसभेत ३७७ प्रमाणे केली आहे. राज्य सरकारला विनंती आहे कि प्रस्तावाचा फेरविचार करून दिबासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. नामदार कपिल पाटील यांनी पुढे म्हंटले कि, सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे करीत असुन यामुळेच माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील ०२ लाख ६९ हजार ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने ०६ लाख गावांचा सर्वांगिण विकास करणे हा ध्येय ठेवून काम करणार आहे, त्यामुळे गावांच्या विकासासाठी नवनवीन योजना आखण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असुन या प्रेरणेतून काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे ते म्हणाले. १४ व्या वित्त आयोगातुन २ लाख २९२ कोटी व १५ व्या वित्त आयोग २ लाख ३६ हजार कोटी निधी माध्यमातून देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास साधून प्रवाहात आणण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात होणारा ग्रामपंचायतींचा विकास हा भाजपच्या माध्यमातून होत असल्याचे भावना ग्रामीण भागातील जनतेच्या मनात रुजविण्याचे काम भाजप कार्यकर्त्याने केले तर पुढील काळात मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी असतील यात तिळमात्र शंका नाही. या जनआशीर्वाद यात्रेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असुन यामुळेच त्यांचे नेते अनाठायी विधान करीत असून तुमच्या प्रतिक्रियेची आम्हाला गरज नसुन जनतेचा वाढता पाठिंबा हीच आमची यशाची नांदी असल्याचा टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना लगावला. आगरी समाज हा विस्तृत पसरलेला असुन या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा, अंत्योदय, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा लोन, शेतकरी सन्मान योजना अशा विविध योजनांचा उहापोह करत या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून निर्माण होत त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत असल्याचे अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री मंडळात ओबीसी, एस, सी., एस. टी. समाजाला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे. कोकणातील माणसाने शिवसेनेला भरभरून दिले परंतु शिवसेनेने कोकणी माणसाच्या विकासासाठी काय केले ? – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून भरभरून आशिर्वाद
रायगड जिल्ह्यातील जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून भरभरून आशिर्वाद मिळाल्याची पावती यावेळी नामदार कपिल पाटील यांनी दिली. या यात्रेच्या नियोजनासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, यात्रा प्रमुख आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, दक्षिण रायगड अध्यक्ष महेश मोहिते, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.
आंदोलनाचे प्रतिबिंब अधोरेखित करणाऱ्या आगरी दर्पणच्या विशेषांकाचे प्रकाशन
दिबांच्या नावाने विमानतळ व्हावे, यासाठी भूमिपुत्रांनी १० जून, २४ जून आणि ०९ ऑगस्टला आंदोलन केले. या आंदोलनाचे प्रतिबिंब अधोरेखित करणाऱ्या आगरी दर्पणच्या विशेषांकाचे प्रकाशन नामदार कपिल पाटील यांच्या हस्ते पनवेल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
असा होता रायगड जिल्हा जन आशिर्वाद यात्रा प्रवास
अलिबाग येथे सकाळी ८. ३० वाजता अलिबाग कोविड रुग्णालयाला भेट दिली तसेच कोविड योद्धयांचा त्यांनी सत्कार केला. यात्रेला सुरुवात झाली. या दरम्यान नुकताच निधन पावलेले माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबाचे त्यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वन केले. त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर अलिबाग विश्रामगृह येथे सकाळी पत्रकार परिषद आणि लाभार्थी व मच्छिमारांची भेट त्यांनी घेत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. त्यानंतर हुतात्मा स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच संत सेवालाल मंदिर येथे त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळाव्यात त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेत त्यांना आश्वस्थ केले. चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा त्यांनी सत्कार केला. त्यानंतर पेण येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेत त्यांना दिलासा दिला. त्यानंतर पनवेलमध्ये आगमन होत असताना उत्तर रायगड भाजपच्यावतीने खारपाडा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणीही ब्रास बँड, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी आसमंत ढवळून गेला होता. याच ठिकाणहून पनवेल पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. पुढे शिरढोण येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारकास भेट देऊन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करून आगरी समाज सभागृहात लाभार्थी भेट आणि लाभार्थी सत्कार कार्यक्रमास त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास संबोधित त्यांनी संबोधित केले.