तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानात वर्चस्व मिळविले आहे. एक एक प्रांताचा ताबा मिळवित तालिबान्यांनी या संपूर्ण देशावर कधी कब्जा केला हे तेथील नागरिकांनाही कळले नाही. तालिबानी क्रूरतेसाठी ओळखले जातात. त्यांनी अफगाणिस्तानात प्रचंड दहशत निर्माण केली असून तेथील भयभीत नागरिक आपला जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत.
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेताच तालिबानने पुन्हा एकदा सत्ता काबिज केली आहे. अमेरिकेत 9/11ला झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला अफगाणिस्तानातील तालिबानने पाठिंबा दिला होता. म्हणून अमेरिकेने सैन्य पाठवून तालिबानची सत्ता उलथवली होती. आता 20 वर्षांनंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान सोडून जाताच तालिबानने पुन्हा कब्जा मिळविला आहे. वास्तविक तालिबानचे सैन्य फक्त 60 हजारांचे आणि अफगाण सरकारकडे तीन लाखांहून जास्त सैनिक होते, पण असे असूनही तालिबानने एकेक करीत अनेक शहरांवर ताबा मिळवत शेवटी काबूलही जिंकले. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणी राज्यकर्त्यांना देश एकसंध ठेवण्यात आलेले अपयश, लष्कराने खालेल्ली कच आणि फुटीरतावाद्यांची मिळालेली साथ तालिबान्यांच्या पथ्यावर पडली. कट्टरतावादी संघटना असलेल्या तालिबानने याआधी 1996 ते 2001पर्यंत अफगाणिस्तानमध्ये राज्य केले होते. पुश्तन जमातीच्या मुल्ला मोहम्मद ओमरने तालिबानची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तालिबानने त्या वेळी कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने अफगाणिस्तानमध्ये कठोर निर्बंध लादले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता होत असल्याची चिन्हे दिसत आहेत, पण तालिबानच्या म्हणण्यानुसार देशातील नागरिकांना आमच्यापासून कोणताही धोका नाही. एवढेच नव्हे तर आम्हाला अमेरिकेसह सर्व देशांशी सलोख्याचे संबंध ठेवायचे असल्याचे तालिबानचे राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी म्हटले आहे, मात्र तालिबानमध्ये प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. तेथील नागरिकांवर अमानूष अत्याचार केले जात आहेत. यामध्ये महिलांनाही सोडले जात नाहीए. म्हणूनच अफगाणी लोक देश सोडून इतरत्र आश्रय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, पण हे इतके सोपे नाही. कारण सर्वच जण विमानतळावर धाव घेत असल्याने तेथे गर्दी होत असून, विमानात मोजकी जागा आणि प्रवासी जास्त असल्याने दुर्घटनाही घडत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन अफगाणी नागरिक जागा न मिळाल्याने विमानाला लटकून प्रवास करीत असताना त्यांचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबारामुळे चेंगराचेंगरी होऊन सात जण मृत्युमुखी पडले आहेत. यावरून तालिबान्यांची किती दहशत आहे हे स्पष्ट होते. या विपरित परिस्थितही काही लोक तालिबानविरोधात लढा देत आहेत, पण अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांचे भाऊ हश्मत घनी यांनी तालिबानसोबत हातमिळवणी केली आहे. अफगाणिस्तानमधील संघर्षाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. अनेक देशांनी तालिबान्यांना विरोध दर्शविला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवादी प्रवृत्तींना थारा नसल्याचे म्हटले आहे. आता अफगाणिस्तानमधील पुढील राजवट कशी असेल आणि तेथील नागरिकांचे जीवन कसे असेल हे समजण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper