बाटला हाऊसप्रकरणी मोदींची काँग्रेसवर टीका
पाटणा : वृत्तसंस्था
बाटला हाऊस प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, तो शहिदांचा अपमान नव्हता का? असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारच्या अररिया येथे शनिवारी (दि. 20) झालेल्या सभेत ते बोलत होते.
काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणाचा आरोप करताना पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या बाटला हाऊस प्रकरणाचा भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, जेव्हा सैनिकांनी दहशतवाद्यांना ठार मारले तेव्हा त्या कारवाईने आनंदित न होता उलट दहशतवाद्यांसाठी काँग्रेस नेत्यांनी अश्रू गाळले. तेव्हा तो शहिदांचा अपमान नव्हता का?
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, 26/11चा हल्ला झाला त्या वेळी देशाच्या वीर जवानांनी पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली होती, मात्र काँग्रेस सरकारने सैन्याला यासाठी मनाई केली. सर्वांना माहिती होते की हा हल्ला घडवणारे दहशतवादी पाकिस्तानी होते. तरीही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पाकिस्तानला इशारा देण्याऐवजी हिंदूंवर दहशतवाद चिकटवण्याचे कारस्थान रचण्यावर लक्ष्य केंद्रित केले.
काही लोकांना आजकाल ‘भारत माता की जय’ बोलण्यावरून पोटात दुखते, मात्र ‘भारत तेरे टुकडे होंगे’सारख्या घोषणांचे समर्थन केले जाते. कोणत्याही जाती-धर्माच्या आधी आपण भारतीय आहोत. आपली ओळख देशाचे नागरिक आहे. आमच्या सरकारने याच भावनेला पुढे नेण्याचे काम केले. त्यामुळे एका बाजूला वोटभक्तीचे राजकारण, तर दुसर्या बाजूला देशभक्ती सुरू आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper