गेली दोन वर्षे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत होते, परंतु मागील तीन दिवसांपासून रायगडचे वातावरण तापू लागले आहे. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्याच्या दुसर्याच दिवशी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनीदेखील पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेते राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगाव येथे रायगडातील शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यातही शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. शेकापदेखील राष्ट्रवादीवर नाराज आहे. हे सर्व पक्ष राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. असे असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष उघड नाराजी व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यातील या पक्षांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात दिसत असली, तरी खरी नाराजी जिल्ह्यात डोईजड होत असलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात आहे. तटकरेंना कोंंडीत पकडण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली. जे पक्ष एकमेकांविरोधात लढले होते ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणली. सत्ता मिळवण्यासाठी केलेली ही तडजोड होती. ही तडजोड वरिष्ठ नेत्यांना मान्य असली तरी स्थानिक नेत्यांना ती मान्य नव्हती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत जाण्यास शिवसेनेचे नेते तयार नव्हते, तरीदेखील पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे ही तडजोड स्वीकारली गेली. रायगड जिल्ह्यात सात विधानसभा सदस्य निवडून आले. त्यापैकी शिवसेनेचे तीन आहेत. भाजपचे तीन व राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. राज्यात सत्ता आल्यामुळे रायगडातील शिवसेनेच्या एखाद्या आमदाराला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाले. त्यांनतर किमान रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्याकडे जाईल अशी आशा शिवसैनिकांना होती, तीदेखील फोल ठरली. तेव्हापासून जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज होते. विकासनिधी मिळत नाही. जिल्हा नियोजन समितीचा निधी देताना दुजाभाव केला जातो. शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या आमदारांना डावलेले जाते अशी नाराजी शिवसेनेचे नेते व्यक्त करत होते. परंतु जाहीर सभेत उघडपणे बंडाची भाषा कुणी करत नव्हते. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जी नाराजी होती, ती जाहीरपणे व्यक्त करण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या गीते यांचा सुनिल तटकरे यांनी 2019 मध्ये पराभव केला. तेव्हापासून अनंत गीते राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. ते दोन वर्षांनंतर श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात दिसले. या पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी बॉम्ब टाकला. या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत, तर शिवसेना आणि काँग्रेस कदापी एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी केला. महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड आहे, असं अनंत गीते म्हणाले. उद्या ही आघाडी संपुष्टात आली तर तुम्ही तटकरेंकडे जाणार का? असा सवालही गीते यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. गीतेंनी जरी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली तरी त्यांचा खरा राग हा खासदार सुनिल तटकरे यांच्यावर आहे. तटकरे शिवसेनेला जुमानत नाहीत. ते डोईजड होत चालले आहेत. त्यांना रोखायचे असेल तर आक्रमक व्हायला हवे. त्यांची कोंडी केली पाहिजे. हे गीते आळखून आहेत. त्यामुळेच राजकीय तडजोड म्हणून राज्यातील महाविकास आघाडीत आम्ही सोबत असलो तरी रायगड जिल्ह्यात आमचा मार्ग वेगळा असेल असा इशाराच अनंत गीते यांनी श्रीवर्धनमध्ये येऊन शिवसेनेच्या मेळाव्यातून खासदार सुनिल तटकरे यांना दिला आहे.
काँग्रेसही आक्रमक
जी बाब शिवसेनेची आहे. तीच काँग्रेसची आहे. काँगे्रसनेदेखील सुनिल तटकरे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँगे्रसने राष्ट्रवादीला मदत केली. सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष करताना काँग्रेसच्या तीन सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात काँग्रेसला एकही सभापतीपद मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी सुनिल तटकरे यांचे काम केले. तटकरे निवडून आले, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँगे्रसच्या उमेदवारांना मदत केली नाही. जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. आमच्या मतांवर मोठे झाले व नंतर आम्हाला विसरले, अशी नाराजी काँग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप करायचे. ते सुनिल तटकरे यांच्यावर उघड टीका करायचे. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनीदेखील तीच खंत व्यक्त केली. त्यांनीदेखील फसवणार्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा रोख सरळसरळ खासदार सुनिल तटकरे यांच्यावरच आहे. एकूणच खासदार सुनिल तटकरे डोईजड होत असल्यामुळेच शिवसेना, काँगे्रस व शेकाप नेते त्यांच्या विरोधात आक्र्रमक झाले आहेत. हे तीनही पक्ष खासदार तटकरेंना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत हे तीनही पक्ष कोणती भूमिका घेतात यावर रायगड जिल्ह्यातील राजकारणाची पुढील दिशा अवलंबून राहील.
शेकाप नाराज
रायगड जिल्हा परिषदेत शेकाप हा मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे 12 सदस्य निवडून आले होते. असे असताना सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत शेकापने सुनिल तटकरे यांना पाठिंबा दिला, परंतु विधानसभा निवडणुकीत शेकापचा पराभव झाला. विशेषतः अलिबाग विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात रोहा तालुक्यातील चणेरे आणि मुरूड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकत आहे, मात्र तेथे शेकाप उमेदवार पंडित पाटील पिछाडीवर राहिले. त्यामुळे शेकाप नेते खासदार तटकरे यांच्यावर नाराज झाले. विधानसभा निवडणुकीनंतर सुनिल तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांचे संबंध बिघडले. दोघांमध्ये सध्या अबोला आहे. आम्ही मागून खंजीर खुपसत नाही, समोरून वार करतो, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी खासदार तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जाणारे होते.
-प्रकाश सोनवडेकर