Breaking News

तोतया पोलिसाकडून ज्येष्ठ नागरिकाला गंडा

नागोठणे : प्रतिनिधी

आम्ही स्पेशल पोलीस आहोत. उद्या मतदान असून एवढे दागिने अंगावर कशाला घालता, असे सांगून येथील एका ज्येष्ठ नागरिकाला दागिने एका रुमालात काढायला सांगून 2 लाख 19 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने बाजूला काढून दोन चोरट्यांनी ते पळवून नेण्याची घटना सोमवारी (दि. 22)  येथील शिवाजी चौकानजीक घडली. या गुन्ह्याची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास चालू करण्यात आला आहे.

नागोठणे येथील खडकआळीत राहणारे नारायण तेलंगे (वय 63) हे ज्येष्ठ नागरिक सोमवारी सकाळी 10 वाजता शिवाजी चौकात उभे असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका 40 वर्षीय इसमाने त्यांच्या जवळ जात, ‘मी तुम्हाला ओळखतो,’ असे सांगून त्यांना गाडीवर बसवून बोलत बोलत कोळीवाड्याच्या रोडवर घेऊन गेला. तेथे या मोटरसायकलवाल्याचा दुसरा साथीदार उभा होता. त्याने आम्ही स्पेशलवाले असून, मागे आम्हीच गांजा पकडला होता, असे तेलंगे यांना सांगितले. उद्या मतदान आहे, एवढे दागिने कशाला घालून फिरता, असे बोलून तेलंगे यांना दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. तेलंगे यांनी अंगावरील सर्व दागिने काढल्यानंतर सोबतच्या भामट्याने रुमालाला गाठ मारण्याच्या बहाण्याने हातचलाखीने दागिने काढून घेतले व रुमाल तेलंगे यांच्या पिशवीत ठेवला. दोन्ही भामटे मोटरसायकलवरून रिलायन्स चौकाच्या बाजूकडे पसार झाले. या प्रकाराने एकच खळबळ माजली.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply